Thursday 23 April 2015

शाळा

सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्याचा मौसम सुरु आहे. ओळखीतल्या शाळकरी मुलांपैकी जवळपास सगळेच पहिल्या नंबरात पास होतायेत. मला प्रश्न पडलाय की सगळेच पहिल्या नंबरात असतील तर दुसरं कोण येतं? की दुसरा नंबर बादच केलाय शिक्षणपद्धतीतून ? शिवाय आजकाल  पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांचे फारसे कौतुक होत नाही. पहिल्या नंबरात आला तरी अमक्या विषयात मार्क जरा कमीच पडलेत अशी चर्चा जास्त होते. कारण त्या कमी मार्कांमुळे पहिला आणि दुसऱ्यातली तफावत कमी होते. या तफावतीमुळे काय फरक पडतो ते माहिती नाही.  कदाचित पालकांना 'अनबीटेबल लीड" हवी असावी असा माझा कयास आहे. अर्ध्या अर्ध्या मार्कांवरून पालकांचे शिक्षकांशी वाद होतात असं ऐकिवात आहे. असो. यावरून शिक्षणप्रवासातल्या काही गमतीजमती मला आठवल्या.
       शालेय जीवनात दहावा नंबर हा माझा बेस्ट परफ़ोर्मन्स होता. तोही फक्त एकदाच ! नाहीतर तेरा, सतरा, एकोणीस या नंबरांचा मी आवडता विद्यार्थी होतो. दुर्दैवाने हे नंबर माझ्या आवडीचे नसल्यामुळे यांचे पाढे मला आजही येत नाहीत! थोडक्यात वर्गातला येणारा नंबर हा माझ्या परफ़ोर्मन्स वर अवलंबून नसून इतरांच्या परफ़ोर्मन्स वर जास्त अवलंबून होता. तिथे अनबीटेबल लीड कायम ठेवण्याची जबाबदारी मी स्वत: वर घेतली होती. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे एकाच वयाच्या असलेल्या आम्हा तीन चुलत भावंडांमध्ये मी बहुतांश वेळा समोर असायचो. शिवाय वडिलांच्या आवडत्या गणित आणि इंग्रजीत मार्क बरे मिळत असल्यामुळे घरी कधी ओरडा बसला नाही. तसंही पाचवी ते सातवी दरम्यान आम्हाला असलेल्या इंग्रजी अभ्यासक्रमाचा दर्जा आत्ताच्या नर्सरीत असलेल्या दर्जापेक्षाही खालचा होता. इतिहास विषय माझ्या आवडीचा असला तरी नागरिकशास्त्रात बोंब होती. तेंव्हा त्या मार्कांचा इतिहास सांगण्यासारखा नाही. नागरिकशास्त्र विषय का शिकवतात असा प्रश्न नेहमी पडायचा. माझे आजोबा सांगायचे," अरे लोकशाहीत राहताना हे ज्ञान आवश्यक आहे बाबा. पुढेमागे निवडणूक वगैरे लढवलीस तर कामात येईल". मी निवडणूक अजून लढवलेली नाही पण नागरिकशास्त्राचा अभ्यास केलेला उमेदवार माझ्यातरी पाहण्यात आला नाही. भूगोलात विषुववृत्तीय प्रदेशाचा अभ्यास आवडायचा. बऱ्याचदा घराच्या गच्चीवर उभं राहून विषुववृत्त कुठे दिसते का हे मी शोधायचो. पण आपण विषुववृत्तामध्ये येत नाही हे कळल्यावर माझा उत्साह मावळला. विज्ञानातले बरेचशे शोध एकतर मला कळत नव्हते किंवा निरुपयोगी वाटायचे. म्हणूनच पुढच्या अभ्यासाचा त्रास वाचवण्यासाठी ,"अणूचे विभाजन होऊ शकत नाही" या महर्षी कणादांच्या थेयरीला माझा पाठींबा होता. भूमिती विषय जोपर्यन्त्त मला एखादी थेयरम (सिद्धांत) सिद्ध करायला कोणी सांगत नाही तोपर्यन्त्त आवडायचा. "मी थेयरम शोधली नाही, मी सिद्ध करणार नाही" असं उत्तर देण्याची त्यावेळी सोय नव्हती.( टिळकांचा तो बाणेदारपणा आणि आमचा तो उद्धटपणा ! या मानसिकतेचा मी जाहीर निषेध करायचो.) सगळ्यात आवडता विषय होता तो म्हणजे मराठी. पण त्यातसुद्धा व्याकरण नावाच्या राक्षसाने माझा फडशा पाडला. संस्कृतविषयी आदरयुक्त भीती वाटायची. हुशार विद्यार्थी संस्कृतला स्कोअरिंग वगैरे म्हणायचे पण अश्या मित्रांची वाईट संगत मी नेहमीच टाळली. 
        चौथीत असतानाची गोष्ट. वार्षिक उत्सवानिमित्त एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्याचे ठरले. प्रत्येक वर्गातील काही हुशार विद्यार्थी निवडले गेले. त्यामुळे त्यात माझा समावेश असण्याचा प्रश्नच नव्हता. पण माझ्यासारख्या  इतर विद्यार्थांचा सहभाग वाढावा यासाठी प्रमुख स्पर्धेआधी एक अनौपचारिक स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत मी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली हे आमच्या वर्गशिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी मला प्रमुख स्पर्धेच्या संघात घेतले. त्यानंतर स्पर्धेत मी जो काही परफ़ोर्मन्स दिला त्याला तोड नाही. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपापसात चर्चा करून मग उत्तर द्या अशी स्पष्ट सूचना आम्हाला दिली होती. पण चर्चा करून प्रश्न सुटतात एवढे प्रगल्भ विचार त्यावेळी मी करत नव्हतो.
पहिला प्रश्न : ग्रीष्म ऋतूनंतर कोणता ऋतू येतो ?
क्षणाचाही उशीर न करता मी समोरचा माईक उचलला आणि सांगितलं : पावसाळा !
सगळ्या मित्रांनी रागाने माझ्याकडे बघितलं.
दुसरा प्रश्न : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान  कोण ?
माझा मित्र उत्तर देणार तेव्हढ्यात त्याच्या हातातून माईक हिसकून मी उत्तर दिलं : नरसिंह राव !
यावेळी मी शंभर टक्के बरोबर आहे असा मला विश्वास होता. कारण त्यावेळी तेच पंतप्रधान होते. आणि त्याचं वय बघून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच पंतप्रधान असतील असं वाटणं साहजिक होतं ! पण माझं उत्तर चुकलं होतं. आता मित्रांनी  माझ्याजवळचा  माईक उचलून पलीकडल्या कोपऱ्यात ठेवला.
तिसरा प्रश्न : स्व. राजीव गांधी यांच्या आईचे नाव काय ?
मला उत्तर येत होते. पण माझ्याजवळ माईक नव्हता म्हणून मी फक्त हात वरती केला. त्या सूत्रसंचालकांनी माझ्या जवळ येउन त्यांचा माईक मला दिला.
मी उत्तर दिलं : सोनिया गांधी !
ते सूत्रसंचालक सर जागच्या जागी हादरले. आणि पूर्ण हॉलमध्ये हास्याचा गडगडाट झाला !
        परीक्षेच्या काळात तर आणखी मजा यायची. भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशावाचनाचा प्रश्न असायचा. एकदा  नकाशात अरबी समुद्र कुठे आहे हे दाखवायचे होते. अरबी समुद्र पश्चिम दिशेकडे आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. पण अमरावतीकडून पश्चिमेकडे बघताना माझी मजल जास्तीत जास्त मराठवाड्यापर्यन्त गेली. आणि तिथेच मी अरबी समुद्र दाखवला ! या भौगोलिक पराक्रमाबद्दल आमच्या वर्गशिक्षिकेने पूर्ण वर्गासमोर माझा सत्कार केला होता. अरबी समुद्राचं मराठवाड्यातला स्थान मान्य केला असतं तर आज तिथे दुष्काळाची परिस्थिती नसती. पण एवढी दूरदृष्टी आमच्या शिक्षकांकडे नव्हती ! विज्ञानाच्या पेपर मध्ये एकदा "चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच का होते ?" असा प्रश्न विचारला होता. त्यावर एका मित्राने लिहिले," पौर्णिमेच्या  रात्री भरपूर प्रकाश असल्यामुळे पृथ्वीला चंद्र लवकर सापडतो आणि ग्रहण सुरु होते !".दुसऱ्या एका मित्राने तर कहर केला होता. वजाबाकी करताना लहान आकड्यातून  मोठा आकडा  वजा करायचा असेल तर बाजूच्या आकड्यातून दशक उसनं घ्यावं असा नियम आहे. (उदा. ६२-५८ , दोनातून आठ वजा करताना दशक  उसनं घेऊन बारातून आठ वजा करणे) तो उसनं घ्यायच्या भानगडीत न पडता ,दोनातून आठ वजा होत नसतील तर आठातून दोन वजा करायचा !    
       शाळेच्या आठवणी लिहिताना एक व्यक्ती मला राहून राहून आठवते. त्यांच्या उल्लेखाशिवाय हे लेखन पूर्ण होऊच शकत नाही. सहावीत असताना गणितातल्या x (एक्स) नावाच्या सतत बेपत्ता असलेल्या मुलाशी ओळख झाली. बरं त्याला शोधायला जावं तर तो कायम अपूर्णांकातच सापडायचा.  x =१०० असं उत्तर कधी आलंच नाही. ह्या एक्सला शोधता शोधता नववीत गेल्यावर एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व गुरु म्हणून  गवसलं. दुर्गे सर ! आपल्या पेश्याविषयी त्यांच्याएवढी तन्मयता असलेला शिक्षक मी पाहिलेला नाही. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच हे माझ्यासहित त्यांचे सगळे विद्यार्थी मान्य करतील. आमच्यातला "एक्स" शोधायला त्यांनीच आम्हाला दिशा दाखवली. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा एक संदेश नकळतपणे आम्हाला दिला.
"एक्सला जरूर शोधा, पण सापडला म्हणून थांबू नका. कारण ज्याक्षणी एक्स सापडेल त्याक्षणी तुमचे शिक्षण संपेल. आणि पर्यायाने तुम्हीसुद्धा !!"
-- चिनार                               

Wednesday 15 April 2015

ह्युमन रिसोर्स - एक प्रजात

चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की,
"कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव  स्वत: मध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो"

नाही नाही... या सिद्धांतावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही  म्हणा, या डार्विनभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ  शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षचं झाले. त्यापैकीच एक प्रजात म्हणजे ह्युमन रिसोर्स किंवा एच आर !डार्विनभाऊंच्या आदरार्थ या प्रजातीची ओळख त्यांच्याच शैलीत करून देतो.
" एच आर ही प्रजात अंगी कुठलेही गुण बाळगता इतरांशी स्पर्धा करून टिकून राहू शकते. एवढेच नव्हे तर, स्पर्धा करता सुद्धा ही प्रजात इतरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते "

एच आर ही प्रजात अल्पसंख्यान्कामध्ये येत असली तरी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. या प्रजातीचा उदय कॉर्पोरेट संस्कृतीत झाला. फार पुरावे उपलब्ध नसले तरी ढोबळमानाने भांडवलशाही आणि समाजवाद यांच्या संघर्षात या प्रजातीची पाळेमुळे असावी. कामगार आणि नोकरदारांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना योग्य तो मोबदला आणि हक्क देण्यात यावे या हेतूने ह्युमन रिसोर्स ही संस्था स्थापन झाली असावी. आणि इथेच थोडा घोळ झाला . कामाचे मूल्यमापन करणे वगैरे ठीक आहे पण ते कोणी करावे याविषयी काहीच नियम ठरवण्यात आले नाही. बरं या मूल्यमापन करणाऱ्यांनी स्वत: कोणती कामगिरी पार पाडावी याविषयी सुद्धा मौन बाळगले आहे. प्रजातीची उत्क्रांती होता होता त्यांनी स्वत: काही जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. म्हणजे एखाद्या कामगाराच्या कौशल्याप्रमाणे त्याला काम देणे, नवनवीन कामगारांना नोकरी देणे वगैरे वगैरे. या जबाबदाऱ्या घेताना आपली प्रजात ही सर्वगुणसंपन्न आहे असा समज करून घेतलेला आहे. खरं म्हणजे या प्रजातीच्या उत्क्रांतीची आणखी एक थेयरी प्रचलित आहे. काहींच्या मते इसापनीतीतील ,"दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ" या गोष्टीतला बंदर हा या प्रजातीचा आद्यपुरुष आहेया बाबतीत डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेता येऊ शकतो. डार्विनच्या मते, बंदरामध्ये बदल घडून मानव उत्क्रांत झाला. पण एच आर च्या बाबतीत बंदरामध्ये खरंच काही बदल घडले की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतोत्या गोष्टीतला बंदर जसा काहीही करता मेवा खाऊन जातो तसंच आजच्या काळातही घडताना दिसतं. स्वत: मेवा नाही खाल्ला तरी चालेल पण इतर कोणाला तो मिळणार नाही याची खातरजमा ते नक्की करतात.

आजकाल या प्रजातीमध्ये महिलावर्गाचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक यांच्यातही ५०% आरक्षण लागू झालं असावं.या प्रजातीत स्त्री- पुरुष असा भेदभाव केला जात नाही. आणि कित्येक कामात महिला पुरुषांपेक्षा वरचढ असल्याच यांनी आधीच मान्य केलं आहे. तसंही "मला पहा अन फुलं वाहा" या तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते असलेल्या या प्रजातीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पुढे आणणं क्रमप्राप्त होतं. कारण यांच्यातल्या पुरुषांकडे पाहून इतर प्रजाती दगड फेकून मारण्याची शक्यताचं जास्त आहे. पण एका बाबतीत ही प्रजात अत्यंत समंजस आहे.काहीही झालं तरी एच आर मंडळी हिंसक प्रत्युत्तर देत नाही. अर्थात अगदीच एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करतात असं नाही. त्यांची प्रत्युत्तर देण्याची पद्धत वेगळीच आहे. सश्याला गाजर दाखवून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ते शिकार करतात. आणि तरीसुद्धा ससा वाचला तर ते दुसऱ्या जंगलातून उच्च जातीचे ससे आयात करतात. कालांतराने आपला ससा स्वत:च जंगल सोडून जातो. हा प्रकार बघून इतर ससे थोडासा उठाव वगैरे करतात. पण त्यांनाही याच मार्गांनी शांत बसवल्या जाते.

का कोण जाणे पण सामान्य मानवजात आणि  एच आर यांच्यात फार सलोख्याचे संबंध नाहीत. दोघांनाही एकमेकांविषयी फार तक्रारी आहेत.
मानवजात म्हणते,"आम्ही लाख नालायक असू पण हे ठरवणारे एच आर कोण ? त्यांची पात्रता काय?”
तर यावर एच आरवाले म्हणतात,"आम्ही कोण म्हणुनी काय पुसिता? आम्ही मॅनेजमेण्टचे लाडके!”
मानवजात: "ह्यांच्या शब्दावर कधीच विश्वास ठेऊ नये"
एच आर: "एक बार हमने कमिट्मेण्ट कर दी, तो हम सौ बार उससे मुकर सकते हैं!"
मानवजात: "हे स्वत: तर काहीच करत नाहीत. रिकामचोट आहेत!”
एच आर: "अपने काम से काम ना रखना यही हमारा काम हैं!”

आता एच आरच्या कामाचा विषय निघालाच आहे तर ते सुद्धा आपण विस्ताराने समजावून घेऊ. पण त्याआधी यशस्वी एच आर होण्यासाठी आवश्यक असलेले गुण लक्षात घेऊया. मुळात अयशस्वी एच आर ही एक कविकल्पना आहे. अजूनतरी अयशस्वी किंवा निराश झालेला एच आर माझ्या पाहण्यात आला नाही. कारण एच आरच्या प्रत्येक खेळाचा नियम "चित भी मेरी पट भी मेरी" इथूनच सुरु होतो. असं असूनही जर चुकून  समोरचा जिंकलाच तर "I will come back to you on this " असं एखादं शस्त्र वापरण्यात येते. एच आरचं संभाषण कौशल्य चांगलं असलंच पाहिजे असं आवश्यक नाही. फक्त काही परवलीचे वाक्य आलटून पालटून योग्य ठिकाणी वापरणं त्यांना जमलं पाहिजे. उदा. एखाद्या कामगाराने तक्रार वगैरे नोंदवली असेल तर लगेच," This is as per company policy " असं उत्तर येतं. किंवा एखाद्याने काही मागणी केली असल्यास लगेच," We are working on it " असं उत्तर येतं. एखाद्याला समजवायचे असल्यास," See, company has big plans. Look at the bigger picture” ही भाषा आणि एखाद्याला समज द्यायची असल्यास," See, you should learn to manage your priorities at work…and even in life!" ही भाषा!

एच आर लोकांना त्यांच्या कामाचाच एक भाग म्हणून कामगारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागते. अश्या उपक्रमांना त्यांच्या भाषेत Employee engagement activities असं म्हणतात. ह्याचाच पर्यायी अर्थ "रिकाम्या हाताला कामं" असाही होऊ शकतो. कंपनीतल्या विविध कर्मचार्यांमध्ये आणि विभागांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहावे यासाठी एच आरला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांचे "ते" विशेष प्रयत्न अत्यंत गुप्ततेने सुरु असल्यामुळे त्याचे तपशील आणि सक्सेस रेट कधीही दृश्य स्वरूपात बाहेर येत नाहीत. नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेताना एच आरला अत्यंत Diplomatic approach ठेवावा लागतो. गेंड्याची कातडी आणि कोल्हयाची बुद्धी असल्याशिवाय हे शक्य होत नाही.कर्मचारी आणि मॅनेजमेण्ट यांचातील दुवा म्हणून सुद्धा एच आरला काम करावं लागतं. बरेचसे एच आर या बाबतीत चाणक्याला आपले आद्यगुरु मानत असले तरी त्यांचे वर्तन नारदमुनीन्पेक्षा वेगळे नसते.

ही प्रजात मॅनेजमेण्टची कितीही आवडती असली तरी काही आघाड्यांवर मात्र अजून म्हणावं तसं यश मिळवू शकली नाही. वर्षानुवर्षापासून ही प्रजात जनमानसामध्ये आदराचे स्थान मिळवायचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या पदरी उपेक्षाच येत आहे. शेवटी यांचातल्या काही तज्ञांनी  एकत्र येउन यावर उपाय शोधण्याचे ठरवले. या मंथनातून कितीतरी प्रभावी उपाय सुचवले गेले. पण वर्षानुवर्षे फक्त उपाय सुचवण्याचाच अनुभव असलेल्या या प्रजातीसमोर, "उपाय अमलात आणायचा कसा ?" हा प्रश्न उभा राहिला आहे. अर्थात या प्रश्नावर ते लवकरच उपाय शोधतील याबद्दल शंका नाहीच !!
                                                                  -- चिनार

                                                     http://chinarsjoshi.blogspot.in/

Friday 10 April 2015

आयपीएल येती घरा!

       पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलीयन खेळाडूंचे अभिनंदन ! का कोणास ठाऊक पण कांगारूंचे अभिनंदन कधी मनापासून करताच येत नाही. तसं त्यांच्या सध्याच्या संघात कोणाविषयी राग नाहीये. पण त्यांच्या पूर्वजांनी केलेले कर्म विसरणं या जन्मात तरी शक्य नाही. असो.
           उपांत्य फेरीत त्यांच्याकडून हारण्याच्या दु:खातून सावरतच होतो की परत त्यांच्याच  स्वागताला उभं राहण्याची वेळ आली. अहो कश्यासाठी म्हणून काय विचारताय ..राष्ट्रीय तमाशा सुरु होतोय या आठवड्यात ! इंडिअन प्रिमियर लीग ! पाहुण्या कलाकारांच स्वागत करायला नको का ? नरेंद्र मोदीन्पेक्षाही अधिक व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या श्री श्री ललित मोदी यांनी सुरु केलेल्या तमाश्याच हे आठवं वर्ष ! आता त्यांनी सक्तीचा सन्यास घेतला असला तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने त्यांचे "आशीर्वाद" या उत्सवामागे असतातच. क्रिकेट या खेळाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवण्याचे श्रेय त्यांनाच जातं. त्यांच्या दूरदृष्टीला तोडच नाहीये. बेटिंग आणि बॅटिंग यांच्यातलं जवळच नातं त्यांनी वेळीच ओळखलं. वर्षभर जगभरात होत असलेले क्रिकेटचे सामने बेटिंग उद्योगाच्या  वाढत्या पसाऱ्याला पूरक नसल्याच हेरून त्यांनी आयपीएलची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेलच. पण म्हणतात ना "पैसा तिथे मार्ग"!
            सगळ्यात मोठी अडचण होती भांडवलाची. त्यासाठी ते मोठमोठ्या उद्योगपती आणि राजकारण्यांना भेटले. 'सबका साथ सबका विकास' हा नारा खरं तर त्यांचाच. फुटबॉलमधल्या इंग्लिश प्रिमियर लीगचे (ईपीएलउदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होते. त्याच्यात थोडेफार बदल करून त्यांनी आयपीएलचा आराखडा तयार केला. तसंही कुठलाही विदेशी खाद्यपदार्थ आपल्याकडे आल्यावर त्यात भारतीय मसाले घातल्याशिवाय आपले लोक ते  चवीने खात नाहीत. त्यासाठीच त्यांनी काही विशेष मसाले तयार केले. आता बघा,ईपीएल मध्ये एखादा खेळाडू करारबद्ध करून घेताना होणार व्यवहार हा खेळाडू आणि क्लब यांच्यापुरताच मर्यादित असतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याचे तपशील बाहेर येतात. ललितजींना एक अभिनव कल्पना सुचली. त्यांनी खेळाडूंचा जाहीर लिलाव करायला सुरवात केली. तसंही एखाद्याची किंमत ठरवायची हौस आपल्याला असतेच,मग ती चारचौघात ठरवली तर काय बिघडलं ? जुन्याकाळातही गुलामांचा (आणि स्त्रियांचा!) लिलाव व्हायचाच ना.   आता द्रविड,गांगुलीसारख्या खेळाडूंची किंमत प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टीनी ठरवली तर त्यात वावगं वाटण्यासारखं काहीच नाहीये. त्यातही गम्मत काय आहे की , एखादा खेळाडू किती किमतीत विकला जाईल किंवा विकला जाईल की नाही जाईल यावरही बेटिंग होऊ शकते ना ! शिवाय या "राष्ट्रीय कार्यक्रमाचे" हक्क विकून मिळणारा पैसा वेगळाच. जिथे पैसा येतो तिथे लोकांचा इण्ट्रेस्टसुद्धा वाढतो. बघा ना, एखाद्या खेळाडूने झेल सोडला तर आपल्या खिशातल्या पैशावर तो खेळतोय या आविर्भावात ," अरे ८ कोटी काय कॅच सोडायला दिले का ***** ?" असा शेरा येतो. 
       ईपीएल मध्ये खेळ चालू असताना मैदानाबाहेर चीयरगर्ल्स नाचत असतात. ललितजींनी त्यांना खऱ्या अर्थाने "मैदानाबाहेर" नाचवायचं ठरवलं. मैदानावर कोणी कोणाला नाचवलं यापेक्षा मैदानाबाहेर कोण कोणासोबत नाचलं याची जास्त चर्चा ललितजींनी होऊ दिली. काही सन्माननीय अपवाद या प्रकारापासून दूर राहिले. काही लोकांनी क्रिकेटच्या संस्कृतीत हे बसत नाही अशी टीकासुद्धा केली. पण कुठल्याही विधायक कार्याला विरोध हा होणारच. या विधायक कार्यामुळे क्रिकेटचा प्रसार होतोय, आंतरराष्ट्रीय सट्टेबाज आकर्षित होतायेत,परकीय चलन देशात येतंय, हे समजण्याएवढी दूरदृष्टी टीकाकारांमध्ये नव्हती. म्हणून ललितजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सामान्य जनतेला सुद्धा ह्या गोष्टी मान्य होत्या. एकाच रंगमंचावर नाट्य,थरार,रोमान्स,वाद-विवाद असं सगळं अनुभवयाला मिळत असेल तर मिळत असेल तर काय हरकत आहे ? ललितजींनी आणखी एक गोष्ट थोड्याफार प्रमाणात ईपीएल सारखी केली. ईपीएलमध्ये मॅंचेस्टर, लिव्हरपूल सारख्या शहरांच्या नावानी टीम्स आहेत. शहराचं नाव नसलं तरी चेल्सी, आर्सेनाल या क्लब्सच्या नावानी टीम्स आहेत. ललितजींनी भारतीयांचे "प्रांत" प्रेम ओळखून शहरांच्या नावाने टीम्स तयार केल्या. त्यामुळे ज्या टीमचा मालक आणि खेळाडू यापैकी कोणीही त्या शहराचे नाही तरीसुद्धा त्या त्या शहराचे लोकं आपापल्या टीम्स ला पाठींबा देऊ लागले. उदा. धोनीचे पूर्वज सुद्धा कधी चेन्नईला गेले नसतील तरी तो चेन्नई सुपर किंग्स नावाच्या संघात. म्हणजे चेन्नई आणि रांची दोन्हीकडली जनता त्या टीम ला पाठींबा देणार. किंवा  पुण्याच्या टीमचा कप्तान गांगुली असूनही पुणेकर त्याला पहिला बाजीराव समजून पाठींबा देणार. "घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लावणं" ही उक्ती ललितजींनी खरी करून दाखवली.
       एवढा मोठा पसारा मांडून सुद्धा फायदा कितपत होईल याबद्दल थोडी शंका होतीच. शिवाय  ज्या लोकांचा पैसा वापरलाय ते उद्योगपती,राजकारणी, किंवा फिल्मस्टार असे मोठे लोकं होते. म्हणून ललितजींनी प्रत्येकाला १० वर्षांसाठी टीमची मालकी दिली. मार्केटच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धंद्यात फायदा मिळायला २-३ वर्ष लागतातच. आता रिलायंस किंवा तत्सम मोठ्या कंपनीला १० वर्षात ५००-६०० कोटींची गुतंवणूक करणं फार अवघड नाहीये. आणि मिळणाऱ्या फायद्याचे आकडे डोळे फिरवणारे आहेत. थेट फायदा नाही झाला तरी जाहिरात तर होतेच आहे. किंवा नुकसान दाखवून काळा पैसा सहज खपवता येतोय. स्विस बँकेत कुजवण्यापेक्षा आयपीएल हा कधीही चांगला मार्ग आहे. शिवाय टीमच्या मैदानावरील कामगिरीचा आणि टीम ला होणाऱ्या फायद्याचा काहीही संबंध नाहीये. कारण आयपीएलच्या एका स्पर्धेला झालेला फायदा सर्व संघ मालकांना समसमान वाटण्यात येतो (BCCI चा हिस्सा सोडून). म्हणजे इकडे संघ  वाईट कामगिरी करत असताना, समर्थक ओरडून ओरडून रक्त आटवत असतात आणि संघमालक मनातल्या मनात हसत असतो. अर्थात वाईट कामगिरीचा परिणाम संघ्याच्या पुरस्कर्त्यांवर नक्कीच होत असेल पण आज नाही तर उद्या संघ जिंकतोच त्यामुळे तेवढा फरक पडत नाही.
      असे एक ना अनेक फायदे असणाऱ्या आयपीएलमुळे  भारतीय क्रिकेटचंसुद्धा खूप भलं झालंय.  टी-२० च्या जमान्यात अजूनही शिवकालीन कसोटी क्रिकेट खेळणारे कितीतरी खेळाडू आयपीएलमुळे भानावर आले. सचिन, राहुल संघात असताना कोणताही कप्तान यशस्वी होऊ शकतो पण  सर्कशीचे नेतृत्व करणे किती कठीण आहे गांगुलीला कळले असेलच. शिवाय काही खेळाडूंना "तुम्ही आता जुने झालात " हे वेगळं सांगायची गरज उरली नाही. त्यातूनच रवींद्र जडेजा सारखे नव्या दमाचे खेळाडू भारतीय संघाला मिळाले. जुन्या काळी फक्त बॉल पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुमालाचे इतरही उपयोग होऊ शकतात हे श्रीसंत सारख्या खेळाडूंनी सगळ्यांना दाखवून दिले.
      कालानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल हे घडतंच असतात. किंवा कधी ललित मोदींसारखे युगपुरुष ते घडवून आणतात. फुटबॉल सारखा खेळ दोनशेहून अधिक देशात खेळला जातो. पण क्रिकेटचा तेवढा प्रसार झाला नव्हता. शेवटी ललितजींनी ते करायचं ठरवलं. त्यांनी क्रिकेटच्या स्वरूपात आमुलाग्र बदल घडवून आणले. बदलांचा आवाका इतका मोठा होता की आता  मूळ क्रिकेट मधल्या बॅट, बॉल, आणि स्टम्प्स या तीन गोष्टी सोडून बाकी सगळं नवीन आहे. अर्थात या तीन गोष्टींमध्ये सुद्धा तांत्रिक बदल झालेतच. पण त्यांचे क्रिकेट्मधले महत्त्व ललितजींनी अजून कायम ठेवले आहे. पण भविष्यात गरज पडलीच तर बॅट-बॉल च्या ऐवजी गिल्ली - दांडू वापरायलासुद्धा ललितजींसारखे युगपुरुष  कचरणार नाहीत!
क्रिकेटच्या मूळ पुरुषाने जर स्वत:चे बदललेले रूप पाहिले तर तो ही म्हणेल,
कोण होतास तू , काय झालास तू ?
अरे वेड्या, कसा विकल्या गेलास तू ??

                                                            -- चिनार

Wednesday 8 April 2015

गोष्टी एकेकाच्या!

      बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे.
      वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे  मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली.
"तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?"
"मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?)
"अरे वा! कुठल्या कंपनीत काम करता?”
"क्ष कंपनीत"
"कधी नाव ऐकलं नाही. नवीन आहे का?”
"नाही. ३५ वर्ष जुनी आहे."
"अच्छा! तसा मी १९८४ चा डिप्लोमा होल्डर आहे मेकॅनिकल! मला ही इंडस्ट्री चांगलीच माहिती आहे. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं”
"तुम्ही कोणत्या कंपनीत होतात?”
"नाही नाही ! मी पहिलेपासून रेल्वेतच आहे."
च्यामारी! आम्ही सहा -सात वर्षापासून घासतोय तरी या इंडस्ट्रीचा आवाका अजून कळेना अन ह्याला डिप्लोमा घेऊन अख्खी इंडस्ट्री कळली!
     
       एकदा कंपनीत चर्चा सुरु होती. आमचे एक अत्यंत अनुभवी वरिष्ठ (ईलेकट्रीकल इंजीनियर), साईटवरचे अनुभव सांगत होते. आम्ही सगळे भक्तीभावानी ऐकत होतो.
"अरे रात्रभर त्या ट्रान्सफॉर्मर चे ईरेकशन सुरु होतं. २५००० KVA चा होता तो......"
तेवढ्यात एक नुकताच साईट वरून आलेला मॅनेजर पचकला.
"काहीही नका सांगू हो. ट्रान्सफॉर्मर लावणं एवढं कठीण असतं होय? आम्ही तर असं हातांनी झेलत झेलत लावायचो ट्रान्सफॉर्मर !"
ते वरिष्ठ एकदम स्तब्ध झाले. आणि शांतपणे म्हणाले.
"ट्रान्सफॉर्मर डिझायनिंगचं पुस्तकसुद्धा असं हातात झेलता येत नाही. तू ट्रान्सफॉर्मर लावला की खोलीतला टेबलफॅन?”

         एकदा घरी एक ओळखीतले गृहस्थ आले होते. त्यावेळी नुकतंच कपिल देव ला "विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ सेन्चुरी" हा पुरस्कार घोषित झाला होता. त्या गृहस्थांच आणि कपिल देवचं काय वाकडं होतं कोणास ठाऊक पण या घटनेवर झालेली चर्चा खालील प्रमाणे
" अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा ?"
"का हो ? असं का म्हणताय ?"
"कपिल देव ची लायकीच नाहीये !"
(अरे बापरे...माझ्या एका श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला होता!)
"असं तुम्हाला वाटतं!"
"मी सुद्धा क्रिकेट खेळलोय म्हटलं..महाराष्ट्राच्या रणजी टीम मध्ये होतो. कपिल देव आयुष्यभर खेळला  ते फक्त एका मॅचच्या भरवश्यावर.. ती पण झिम्बाब्वे विरुद्ध ..१७५ काढले होते"
"म्हणजे त्याआधी आणि त्यानंतर, तो कधीच चांगला खेळला नाही???”
"नाही..!!"
"तुम्ही किती वर्ष खेळला महाराष्ट्राकडून?"
"एक सीझन खेळलोय. त्यातही एका मॅचमध्ये  प्लेयिंग एलेव्हन मध्ये होतो"
देवां.....ज्या मॅचच्या भरवश्यावर कपिल देव  आयुष्यभर खेळला असं म्हणतायेत त्यात तो कॅप्टन होता हो...आणि वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळी आपण ! आणि हे एका सीझन च्या भरवश्यावर विस्डेन च्या ज्युरींना अक्कल शिकवतायेत !

      कंपनीतल्या एकाने तर कहर केला होता. शाळेत असताना ते हॉकी खेळायचे म्हणे. आणि कर्मधर्मसंयोगाने धनराज पिल्ले त्यांचा वर्गमित्र होता. (खरं - खोटं माहिती नाही!) एकदा ते म्हणाले
" हा धन्या खरंच नशीबवान निघाला"
"का हो ?"
"अरे आम्ही सोबत खेळायचो. मी कॅप्टन होतो शाळेचा"
"बरं मग ?"
"अरे दहावी पास झालो.. नंतर माझी हॉकी सुटली. आणि हा खेळत राहिला. अभ्यासाच्या नावाने बोंब होती त्याची. झाला भारताच्या टीममध्ये सिलेक्ट "
" अहो पण नशिबाचा काय संबध ? कॅलिबर होतं त्याचं तेवढं"
"कसलं कॅलिबर डोंबल?? मी खेळणं थांबवलं आणि हा सिलेक्ट झाला !!" 

      एका मित्राला शेयर मार्केटविषयी बोलायला फार आवडायचं. वॉरेन बफेटनंतर मार्केट त्यालाच कळलंय अश्या आविर्भावात तो बोलायचा.
"तुला सांगतो.. मार्केट उगाच खाली-वर जात नाही. त्याला १०० नियम आहेत. मी अभ्यास केलाय त्याचा. बघ तू... पुढचे वर्ष मार्केट वरच जाणार"
त्यानंतर काही दिवसातच मार्केट बदाबदा खाली पडलं.
"अरे असं होतं कधीकधी..१० पैकी वेळा मार्केट नियम पाळते.. वेळा पाळत नाही"
"त्या वेळा कश्या ओळखायच्या?"
"एवढं सोप्प नाहीये...अभ्यास करावा लागतो... मी अभ्यास केलाय त्याचा!!!"

            एका मित्राला बढाया मारण्याची सवयच जडली होती. कोणताही विषय काढला की तो सुरु व्हायचा. बोलण्याचा सूर साधारण असा असायचा ," माझे एक काका US ला आहेत ..वगैरे वगैरे..." त्याचे काका किंवा मामा जगातल्या सगळ्याचं देशांमध्ये होते. ते कमी पडलेच तर दादा आणि ताई तर अगणित होत्या. एकदा असंच कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. तो घाईघाईने म्हणाला.
"चल मी निघतो."
"अरे कुठे चालला एव्हढ्यात."
"अरे मला दादाकडे जायचंय."
(एवढी चांगली संधी मी कशी सोडणार !)
"अरे थांब ...संध्याकाळी US साठी कोणतीच फ्लाईट नाहीये !!! "

      असे कितीतरी महाभाग दैनंदिन आयुष्यात भेटतात. कधी रेल्वे किंवा बस प्रवासात आपल्या सह्प्रवाश्याशी बोलून बघा. वास्तविक प्रवासात होणारी चर्चेचा उद्देश फक्त टाईमपास हाच असतो.तिथे झालेली ओळख ही तेवढ्या वेळापुरती असते. पण बढाईखोर अश्या संधीची वाटच पाहत असतात. एकदा माझ्या शेजारी बसलेले काका, त्यांना रेल्वे प्रवासाचा कसा दांडगा अनुभव आहे हे सांगत होते.
"अरे मी जेवढे दिवस घरात राहिलो असेल त्याहून जास्त दिवस रेल्वे प्रवासात राहिलोय"
"हो का ! अरे वा"
" हा रुट तर माझ्यासाठी रोजचाच आहे...सगळ्या गाड्यांच्या वेळा माहितीयेत मला"
"अच्छा"
त्यांना खरोखरच गाड्यांची माहिती असावी. पण त्यांना ते सिद्ध करून दाखवायचंच होतं. पूर्ण प्रवासात आम्हाला क्रॉस झालेल्या प्रत्येक ट्रेनचं नाव त्यांनी मला सांगितलं (एकतर या बहुमुल्य माहितीचा मला काहीही उपयोग नव्हता आणि त्यांनी कोणतंही नाव सांगितलं तरी हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता.).पण एका कुठल्यातरी ट्रेनचं नाव त्यांना काही केल्या आठवत नव्हतं. ती ट्रेन आम्हाला तेंव्हा क्रॉस होत होती.
"अरे मी गेलोय रे या गाडीनी...नाव आठवत नाहीये खरं!"
"जाऊद्या काका"
"अरे असं कसं? माहितीये ना मला"
"अहो मग आठवत नसेल तर उतरून विचारून या ना", मी नकळतपणे बोलून गेलो.
ते काका थोडावेळ शांत बसले. पण त्यांना काही राहवेना.
"रेल्वे बजेट पार हुकलय बघ यावेळी"
"का? काय झालं?"
"अरे नुकसानीत चाललीये रेल्वे..थोडी भाववाढ करायला हवी होती."
"नुकसान?"
"मग काय ? तुमच्या प्राह्यव्हेट कंपन्यानसारखा खोऱ्यानी पैसा नाही ओढत रेल्वे..हेच कळत नाही ना तुम्हाला...अरे तुम्ही लोकं............................"
काका मगाचा बदला घेणार हे माझ्या लक्षात आले.
"सगळं मान्य आहे काका! पण प्राह्यव्हेट कंपन्यानसारखा इन्कम टॅक्स भरावा लागतो का रेल्वेला? बारा महिने तेजीत चालणारा दुसरा कुठला धंदा पाहिलाय तुम्ही? बरं ते जाऊद्या..कोणत्या धंद्यात ६० दिवसाआधी १०० टक्के पेमेण्ट मिळते ? वारंवार वाईट अनुभव येऊनही कस्टमर परत प्रवास करायला येतात असं दुसऱ्या कोणत्या धंद्यात होतं?
काका नंतर पूर्ण प्रवासात शांत होते !


-- चिनार