शिक्षणाच्या
नावाने....चांगभलं!
तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले
काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी
नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी
मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल
ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो.
(आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!)
पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे.
प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत. त्याच प्रश्नांच्या मालिकेचा उहापोह करण्याचा हा
एक प्रयत्न.
कसंय की विजेचं भारनियमन आणि आमचा शैक्षणिक
अंधार यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये हे मान्य! कारण अद्वितीय आकलनशक्तीमुळे आमच्या
ज्ञानाची कवाडे सतत दिव्याखाली अंधार या परिस्थितीत असायची.त्यामुळेच भारनियमन असून
नसून काही विशेष फरक पडणार नव्हता. पण प्रश्न असा आहे की, जिथे काहीही केल्या आमची
मजल साठ-सत्तर मार्कांच्या पलीकडे जात नव्हती तिथे आज १४३ मुलांना १०० टक्के मार्क
पडतात तरी कसे? म्हणजे अशी काय अमूलाग्र सुधारणा आपल्या शिक्षणपद्धतीत झाली आहे? थोडी
चौकशी केल्यावर कळलं की,एक सुधारणा म्हणून आजकालच्या परीक्षा या जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह
पद्धतीने घेतल्या जातात. म्हणजे एका प्रश्नाला उत्तर म्हणून चार पर्याय, त्यातला एक
बरोबर निवडायचा वगैरे वगैरे. शिक्षकांच्या शपथेवर सांगतो आम्ही या पद्धतीनेसुद्धा दिवेच
लावले असते. कारण ही पद्धत म्हणजे 'चुकीला माफी नाही' या प्रकारातली आहे. आणि आम्हाला
चुकण्याशिवाय पर्यायच नाही!! त्यामुळेच सर्व उपलब्ध पर्यायांची चाचपणी करता करता परीक्षेची
वेळ संपली असती.
यावरून आम्ही किमान पास तरी व्हावे
यासाठी आमच्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न आणि सांघिक कामगिरीने आम्ही त्याचा उडवलेला
फज्जा या सगळ्या गोष्टी मला आठवल्या.
आमच्यावेळी वर्गातल्या पोरांचं लक्ष जरातरी अभ्यासाकडे
वळावं म्हणून मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी असे छोटेमोठे बदल केल्या जायचे.तरीसुद्धा
आमच्या वर्गातली पोरं कार्यानुभव,एनसीसी वगैरे फालतू विषयांसाठी सकाळपासून शाळेत जाऊन
बसायची. एवढंच काय तर पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जातो असं सांगून, शाळेत आपापले 'पक्षी'
टिपत बसायचे. त्यामुळे या छोट्यामोठ्या सुधारणा आमच्या आधीच सुधरलेल्या पोरांसाठी काहीही
उपयोगात आल्या नाहीत. आणि आजकाल तर मुलं मुली एकाच बाकावर बसतात म्हणे. तरीसुद्धा शंभर
टक्के?? आमच्या शिक्षकांचं नशीब थोर म्हणून ही असली थेरं आमच्यावेळी केली नाहीत. पोरांनी
'कोणत्या' विषयात शंभर टक्के 'कामगिरी' केली असती काही नेम नाही! आमच्यापेक्षा एक वर्ष
सीनीअर असलेल्या पोरांसाठी केलेली आणखी एक
सुधारणा म्हणजे वर्गातल्या काही गुणवत्तावान विद्यार्थाना निवडून, शिक्षक त्यांच्यावर
जास्ती मेहेनत घ्यायचे. आता एखाद दुसरा अपवाद वगळता हा खरं म्हणजे वासरात लंगडी गाय
शहाणी असा प्रकार होता. कारण आम्ही सगळी गुरंढोरं एकाच शेतात राबवायच्या लायकीचे होतो.आमच्यावेळी
हा प्रकार बंद झाला कारण गुणवत्तावान विद्यार्थी शोधण्यातच शिक्षकांना जास्त मेहनत
करावी लागणार होती. ट्रायल अँड एरर करता करता परीक्षा तोंडावर आली असती. शेवटी शिक्षकांनी
एक अभिनव मार्ग शोधला. हुशार मुलं निवडण्यापेक्षा 'ढ' मुलं निवडली. आता या गटासाठी
उमेदवारांची कमी नव्हतीच. इथे माझी इतक्या वर्षांची अविश्रांत मेहनत फळाला आली. आणि
मोठ्या दिमाखात मी त्या गटात प्रवेश केला. अक्षरश: हाऊसफुल होऊन सुरु झाले हे वर्ग! मग पालक-शिक्षक मिटींग्स वगैरे होऊ लागल्या. प्रत्येक मीटिंगमध्ये 'हुशार खूप आहे हो तो,पण अभ्यासाचं
करत नाही' ह्यावर दोन्ही पक्षांचं एकमत व्हायचं.( त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर ह्याच वाक्याचं स्वरूप 'भारताने ठरवल्यास, २०२० मध्ये
भारत ही एक महासत्ता असेल' असं असायचं!) शेवटी शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना यश आले.
आणि २०२० च्या होऊ घातलेल्या भारतीय महासत्तेत आणखी एका सुशिक्षित अज्ञानवीराची भर
पडली.
इथून प्रश्नाचा दुसरा भाग सुरु होतो.
आमच्या अज्ञानाच्या अमर्यादित कक्षेचं अस्तित्व आम्ही मान्य केलं आहे. असं असताना,
ज्यांनी कधीकाळी आम्हाला फाटकातून
आतमध्येही घेतलं नसतं त्या बिट्स पिलान्या अन
कोपऱ्याकोपऱ्यातल्या मॅनेजमेंट इंस्टीटयूटा आजकाल मेल पाठवू पाठवू ऍडमिशन घ्या
म्हन्तेत बा!!
ह्यांचं स्टॅंडर्ड घसरलं का आमचं वाढलं तेच
कळत नाहीये. ती दिल्लीतली एक नॅशनल इन्स्टिट्यूट तर माझ्या हयातीत किंवा मरणोत्तर मला
डॉक्टरेट दिल्याशिवाय राहणार नाही असं दिसतंय.दोन-चार वेळा फोन टाळल्यावर एकदा त्या
बाईशी मी डिट्टेलमध्ये बोललो. तिच्या मते, डिग्री मिळवायला कॉलेज,लेक्चर,प्रोजेक्ट,अभ्यास
यागोष्टींचे बागुलबुवे उगाचच उभे केले आहेत. आता यापैकी डिग्री मिळवायला फारसा अभ्यास
करावा लागत नाही ह्या वाक्याशी मी आणि माझे कुटुंबीय बिनशर्त सहमत होतील. पण लोकलज्जेखातीर
इतर अनेक गोष्टी कराव्याच लागतात हा स्वानुभव आहे. तर ती बया म्हणे, एकदा पैसे भरले
की सहा-सात महिन्यात डिग्री घरी येईल. याउपरही जर मला लेक्चर वगैरे हवेच असतील तर डिस्टन्स
लर्निंगची व्यवस्था आहे म्हणे. पण तिच्या मते, व्हाय टू वेस्ट टाइम? आम्ही एका डिग्रीसाठी
आयुष्यातले वीस-बावीस वर्ष कशाला वाया घालवले तेच कळत नाही. कारण ज्ञानाचा अंधार तर
दोन्हीकडे आहेच. कसं होतंय की, शिक्षणपद्धतीवर टीका करणे हा आमचा आवडता टाईमपास आहे.
पण इथे नेमकी टीका कोणावर करावी हेच कळत नाहीये. शिक्षणाचा बाजार झालाय वगैरे गोष्टी
तर लहानपणापासून ऐकत आलोय. पण हे म्हणजे पार डी-मार्ट,वॉलमार्टच्या पातळीचं होलसेल
मार्केट झालं की हो! अरे एखाद्या डॉक्टरला डिस्टन्स लर्निंगने सर्जरी शिकवायलासुद्धा
हे लोक मागेपुढे पाहणार नाही उद्या. एकेकाळी बिट्स पिलानी वगैरे आमच्यासाठी तीर्थक्षेत्रे
होती. आता हळूहळू ते पिकनिक स्पॉट होतील का काय अशी शंका वाटते.
आता कल्पना करा,बिट्स पिलानीमध्ये
त्या शंभर टक्केवाल्या मुलांच्या शेजारी जर आमच्यासारखे सेल्फ्या घेत उभे राहिले तर
काय होईल?? त्या बिचाऱ्यांना 'याचसाठी केला का अट्टाहास' असा प्रश्न पडेल. खरं सांगू
का, ह्या एकशे त्रेचाळीस मुलांच्या मार्कांची बेरीज केल्यास, तेव्हढ्या मार्कात आमची
अख्खी पिढी पास झाली हे लक्षात येईल. आणि जर चुकून, त्यांच्या आणि आमच्या मार्कांची
वजाबाकी केली तर लांबलचक जनरेशन गॅप दिसेल. म्हणून मी तर आजकाल देवाकडे एकचं गोष्ट
मागतो.
"परमेश्वरा,माझ्या
प्रश्नांचं तू लोड घेऊ नको. त्यांची उत्तरं नाही मिळालीत तरी चालतील.पण ही जनरेशन गॅप
वाढत चाललीये. पुढेमागे आम्हाला तोंड लपवण्यापुरती तरी गॅप मिळू दे रे बाबा!!"
--
चिनार