(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग)
कलीयुगातले हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याळातला एक सेकंद असतो असं म्हणतात. यासारखंच एक नवीन समीकरण आता रुजू झालंय. आपल्या आयुष्यातल्या एका वर्षात तंत्रज्ञान एका युगाने समोर जातंय. या अनुषंगाने मोबाईल क्रांती विषयी बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यापूर्वी घेतलेला लेटेस्ट स्मार्टफोन तुम्ही अश्मयुगात असल्याची ग्वाही देतो. सध्याच्या काळात आय फोन ६
एस वापरणारेसुद्धा आय फोन ६ वाल्यांकडे ,"सो मिडलक्लास!" अश्या नजरेने बघतात. आयफोन वन वगैरे तर हडप्पा संस्कृतीसोबतच नामशेष झालेत. अश्यावेळी तब्बल अडीच युगे जुना असलेला माझा स्मार्टफोन (आयफोन नाही !) जेंव्हा मी चारचौघात बाहेर काढतो तेंव्हा काय होत असेल विचार करा. क्रेडीट कार्डच्या जमान्यात एखाद्याने डी-मार्ट किंवा बिग-बझारमध्ये चुकून रेशन कार्ड दाखवले तर त्याचं जे आदरातिथ्य होईल तेच माझं होते. कितीतरी लोकांनी मला,"अरे फोन फार स्वस्त झालेत आजकाल, घेऊन टाक नवीन." वगैरे सल्ले दिलेत. 'फार स्वस्त' ह्या शब्दाची व्याप्ती हल्ली पन्नास हजारापर्यंत गेली आहे. यावर सुद्धा त्यांचे उत्तर तयार असते. ते म्हणतात,"तुरडाळ कशी खातोस २०० रुपयांची ! मग चांगला फोन घ्यायला काय होते?" बहुधा अच्छे दिन,अच्छे दिन म्हणतात ते हेच असावे. म्हणजे गरिबी ही एक मानसिक अवस्था असून काहीही झालं तरी आपण खानदानी श्रीमंत आहोत ही भावना सोडायची नाही!
असो. तर लोकलज्जेस्तव मी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागलो. आता एकवेळ प्रश्न फक्त आर्थिक असता तर गोष्ट वेगळी होती पण आमचं तसं नाही ना. स्मार्टफोन किंवा एकंदरीतच तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमचं अज्ञान हे दिवसागणिक अपडेट होतं असतं. म्हणजे अडीच वर्षात तंत्रज्ञान जर अडीच युगे समोर गेलं असेल तर आम्ही अडीच हजार प्रकाशवर्षे मागे गेलेलो आहे. (इथं प्रकाशवर्ष म्हणजे 'आमच्या डोक्यात प्रकाश पडायला लागणारा वेळ' असं गृहीत धरलंय!) माझ्या सध्याच्या स्मार्ट्फोनमध्ये असलेल्या कितीतरी गोष्टी मला आत्ता कुठे उलगडायला लागल्या होत्या. ते पॅटर्न लॉक कसं करायचं हे मोबाईल घेतेवेळी दुकानदाराने मला सांगितलं होतं, त्यानंतर आजवर ते कुठून करायचं हे मला सापडलेलं नाहीये. मी काहीही न करता फोनमधले अँप्लिकेशन्स अपडेट का होतात हे आणखी एक न
उलगडलेलं कोडं ! म्हणजे अँप्लिकेशन्स उगाचच अपडेट होणार...ते जास्त जागा घेणार..मग मला हवे असलेले अँप्लिकेशन्स घ्यायला जागा नाही उरणार..घेतलेच तर त्यामुळे फोन स्लो होणार...आणि चारचौघात ह्याविषयी तक्रार केली की," तुला कशाला हवे एवढे अँप्लिकेशन्स?" असं म्हणून आमच्याच अकलेचे धिंडवडे निघणार !! 32 जीबी मेमरी कार्ड असलेला माझा फोन स्लो झालाय म्हणून मी दुकानदाराला दाखवल्यावर तो म्हणाला," साहेब किती डाटा भरलाय तुम्ही? प्रोसेसरवर लोड येतं अशाने.होणारच ना फोन स्लो." अरे मग बत्तीस जीबी जागा काय म्हशी बांधायला वापरायची का? मला ह्यातलं जास्त कळत नाही पण एखाद्या प्रोसेसरला जर इतका डाटा झेपत नसेल तर त्या दोघांचं लग्न तरी का लावण्यात येतं ? कोअर टू डीओ अन् डीओ टू ऑक्ट्रा वगैरे जाहिराती हेच लोकं करतात ना? म्हणजे पंधरा-वीस हजार रुपये मोजून या स्पेसिफिकेशनचा फोन घ्यायचा आणि त्याला देवघरात ठेऊन रोज हळद कुंकू वाहायचं अशी अपेक्षा असते का ? स्मार्ट्फोनविषयी काही प्रश्न हे कधीच विचारायचे नसतात हे गेल्या अडीच वर्षात माझ्या लक्षात आलंय. उदाहरणार्थ १.स्मार्टफोनचं आयुष्य किती ? चुकून तुम्ही हा प्रश्न विचारलाच तर," वो आप यूज कैसे करते हैं उसपे डिपेंड है. पानी मे भिग गया तो खराब हो सकता हैं." असले उत्तरं येतात. आता स्मार्टफोन आपण बदाम भिजवल्यासारखा पाण्यात भिजवून ठेवतो का? शंभरातला एखादा फोन चुकून पाण्यात पडतो. त्याचा इथे काय संबंध? पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न
देणं हा प्रगत तंत्रज्ञानाचा पाया आहे!
हे असं सगळं असताना नवीन फोन कसा निवडायचा या विचारात मी पडलो. मागच्या वेळी मदत केलेल्या दोन्ही भावांनी आता माझ्या अज्ञानासमोर सपशेल शरणागती पत्करली होती. "तेव्हढं सोडून काहीही बोल", या शब्दात माझा प्रस्ताव फेटाळला गेला. त्यांच्या मते अडीच हजार वर्षे उशिरा जन्मलेल्या माझ्यासाठी नोकिया 3310 हाच एकमेव पर्याय आहे. (तसं नोकिया आणि माझ्यात काहीतरी साम्य नक्कीच आहे. तंत्रज्ञान डोक्यावरून जायला लागल्यावर त्यांनाही कंपनी विकावीच लागली ना! त्यांना मायक्रोसॉफ्टने घेतलं म्हणून त्यांचं तेव्हढं कौतुक अन आमचे धिंडवडे! नोकियाची ही गाथा आज केस स्टडी म्हणून अभ्यासली जाते तशी माझी गाथा 'गेलेली केस' स्टडी म्हणून का अभ्यासली जाऊ नये असा एक विचार उगाचच माझ्या डोक्यात येऊन गेला.) शेवटी कुठूनही मदत मिळणारं नाही हे कळल्यावर मी स्वतः संशोधन सुरू केलं. संशोधनाचा आधीच अध्याहृत असलेला पहिला निष्कर्ष : आमचं बजेट आणि मोबाईलच्या किमती ह्यांचं प्रमाण व्यस्त आहे. (बेसिकली ही बाब आमच्या कोणत्याही खरेदीला लागू होते!) म्हणजे फोन न घेण्याचं सबळ कारण मिळणार. मग संशोधनाचा शेवटचा निष्कर्ष निघणार,
" मला हव्या असलेल्या स्पेसिफिकेशनचा फोन मार्केटमध्ये योग्य किमतीत उपलध नसल्यामुळे, नवीन फोन घेणे तूर्तास स्थगित करण्यात येत आहे"
रीड बिटवीन दि लाईन्सच्या सिद्धांतानुसार वरील निष्कर्षांचा खरा अर्थ खालीलप्रमाणे,
"मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फोनचे स्पेसिफिकेशन माझ्या गरज आणि आकलनक्षमतेपेक्षा कितीतरी प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे, नवीन फोन घेणे किमतीचे कारण देऊन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे!”
--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/