Thursday, 4 June 2015

राजमहालातला एक दिवस

या आधीच्या 'संसदेतील एक दिवस' आणि 'शेतातील एक दिवस' या दोन लेखांच्याच धरतीवर हे पुढील लेखन प्रकाशित करत आहे.
आज सकाळपासूनच विकासपुरुष आपल्या भव्य प्रासादात अस्वस्थपणे चकरा मारत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. सेवकांची तर आतमध्ये जाण्याची पण हिम्मत होत नव्हती.
विकसपुरुष  : कोण आहे रे तिकडे ?
सेवक : जी..मी आहे हुजूर. आज्ञा द्यावी.
विपु. : अरे मी कोण आज्ञा देणारा ? आज्ञा वरतून आलीये.
सेवक : लहान तोंडी मोठा घास घेतो हुजूर पण नागपूर तर दक्षिणेकडे आहे आपल्या राजवाड्याच्या ..उत्तरेकडून आज्ञा कशी काय आली जी ?
विपु.: अरे गाढवा..वरतून  म्हणजे महामहीम यांनी दिलीये आज्ञा ..
सेवक : काय आज्ञा दिली जी ?
विपु.: जास्त आज्ञा देऊ नका अशी आज्ञा दिलीये त्यांनी !
सेवक : म्हणजे काय जी ?
विपु.: म्हणतायेत लोकशाहीला बांधील आहो आपण हे विसरू नका..सारखे सारखे "हुकुम" काढून आपली "वट" दाखवू नका !
सेवक : मग बरोबर आहे की जी !
विपु.: अरे काय बरोबर आहे ? अश्याने विकास कसा होणार?
सेवक : कोणाचा ?
विपु.: कोणाचा म्हणजे ...देशाचा !
सेवक : एक बोलू का जी ? इथं जो येतो तो या विकासाच्याच मागे लागतो..सतत विकास विकास करत राहतो..कोण आहे कोण हा विकास ?
विपु.: पाच वर्ष थांब कळेल तुला
सेवक : या आधीचे राजे पण असेच बोलले होते ..पण काय झालं नाही जी पाच वर्षात..आमच्या तीन पिढ्यांनी काम केले जी या राजवाड्यात..कोणालाच विकास दिसला नाही..
विपु.: बरं बरं..ते जाऊदे..तू माझी बॅग भरून  ठेव आज..संध्याकाळी दौऱ्यावर निघतोय मी.
सेवक : हो जी भरून ठेवतो..दौरा कुठे आहे म्हणायचा ?
विपु.: युगांडा..!
सेवक : कुठ आलं जी हे ?
विपु.: अरे वेड्या..आफ्रिका खंडात आहे हा देश..६५ वर्षात आपल्या देशातून कोणीही भेट दिली नाही तिथे..
सेवक: ६५ वर्षात आमच्या खेड्याला बी कोणीच भेट दिली नाही जी..
विपु.: अरे खेड्यांचाच विकास करायचा आहे मला..
सेवक : युगांडात जाऊन ?
विपु.: अरे युगांडात झिर्कोनियम चे साठे सापडले आहेत..झिर्कोनियम स्वस्तात आयात करून खेड्यापाड्यात पोहोचवायचा आहे मला.
सेवक : हे काय असते जी ?
विपु.: झिर्कोनियम माहिती नाही तुला !! अणुउर्जा निर्माण होते झिर्कोनियम वापरून.
सेवक : हुजूर खेड्यापाड्यात काय करायची आहे अणूउर्जा ? त्या झिर्कोनियमपेक्षा पाणी पोहोचावा हो आमच्या खेड्यात..कास्तकार खुश होतील..
विपु.: तूझ्याशी बोलून काही उपयोग नाही. तुला काहीच कळत नाही.
सेवक : माफी असावी हुजूर...विकास जरूर करा तुम्ही देशाचा..पण झिर्कोनियम पिऊन तहान नाही भागत जी  देशाची..तिथे पाणीच लागते..अणूउर्जा खाउन पोट नाही भरत जी..तिथे भाकरीच लागते..इथे जो येतो त्याच्या स्वप्नातला देश घडवू पाहतो..पण जनतेच्या स्वप्नांकडे कोणी बघायला पाहिजे ना जी..जनतेला स्वप्न पाहणं बी परवडेना झालंय हुजूर..
विपु.: अरे काय बोलतो आहेस तू ? कालपर्यन्त ही परिस्थिती होती हे मान्य..पण आम्ही आल्यापासून 'चांगले दिवस' येतायेत जनतेसाठी.
सेवक : चांगल्या दिवसाचं कसं असतं ना हुजूर...त्याची वाट बघता बघता जनता जे आहे त्यालाच चांगलं मानायला लागते.
विपु.: पालथ्या घड्यावर पाणी ओततोय मी मगापासून. तू जा..सगळे आलेत का बघ दरबारात?
सेवक : आलेत की हुजूर..सगळा दरबार भरलाय कधीचा..
विपु.: अरे मग मी इथे काय करतोय ?
सेवक : विकास करताय !

विकासपुरुष तावातावाने दरबाराकडे निघाले. दरबारात स्थानापन्न झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकला.
विपु.: आजच कामकाज सुरु करा.
सेनापती: हुजूर शेजारी राष्ट्राने सीमेवर पुन्हा कारवाया सुरु केल्या आहेत. आपली आज्ञा असेल तर ....
विपु.: नाही ! युद्ध सुरु होईल असं काहीही करू नका.
सेनापती: मग काय करायचं हुजूर ?
विपु.: तिथल्या बादशहाच्या मातोश्रींना साडीचोळी पाठवा. आणि त्यांच्या क्रिकेट संघाला आपल्या इथे खेळायला बोलवा.
सेनापती: हुजूर पण सीमेवर आपले जवान....
विपु.: तुम्हाला परदेशनीती कळत नाही सेनापती...युद्ध तोच जिंकतो जो तह जिंकतो !
सेनापती: पण त्यासाठी युद्धाची सुरवात तर व्हायला हवी ना ?
विपु.: क्रिकेटच्या मैदानावर युद्ध होऊ द्या..तह आपण बादशाहाशी करू. त्यांनाही बोलवा सामना बघायला.
सेनापती: मागच्याही वेळी आपण हा प्रयत्न केला होता पण....
विपु.: आता या विषयावर चर्चा पुरे..पुढला मुद्दा घ्या.
खजिनदार : हुजूर..काही केल्या महागाई नियंत्रणात येत नाहीये. जनता त्रस्त आहे.
विपु.: तुमच्याजवळ काही उपाय आहे का यासाठी ?
खजिनदार : हुजूर..तेल स्वस्त झालं तर बाकी गोष्टीही स्वस्त होतील.
विपु.: अरब सुलतानाला फोन करा..आम्ही येतोय म्हणून सांगा.
उद्योगमंत्री: माफी असावी हुजूर..पण त्यापेक्षा आपल्याच देशातील तेलसाठे शोधलेत तर उत्तम होईल.
विपु.: मनातलं बोललात..गौतम राजेंची जहागीरी असलेल्या कच्छच्या रणात तेलसाठे असण्याची शक्यता आहे. त्यांना खोदकामाला परवानगी द्या. आणि काय लागेल ते अर्थसहाय्य द्या.
उद्योगमंत्री: हुजूर पण तिथे साठे नाही सापडले तर ?
विपु.: तर तिथे स्मार्ट सिटी वसवू...विकास तर होणारच!
उद्योगमंत्री: हुजूर..राजस्थानच्या वाळवंटात तेलसाठे सापडू शकतात. आणि अरबी समुद्रात सुद्धा !
विपु.: काय सांगता..लगेच खोदकाम चालू करा. राजस्थानातून जामनगरला पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा बोलवा. नीताबेनला समाजकार्यासाठी जामनगर दत्तक घ्यायला सांगा.
उद्योगमंत्री: पण हुजूर..एवढ्या मोठ्या कामासाठी मनुष्यबळ कुठून येणार ?
विपु.: त्यात काही विशेष नाही..उत्तरप्रदेश आणि बिहारचे - जिल्हाधिकारी गुजरातला आणा..मनुष्यबळ आपोआप येते.
उद्योगमंत्री: पण उत्तरप्रदेशात - महत्वाचे प्रकल्प सुरु करा असं सुचवणार होतो.
विपु.: सध्या राहूद्या..तिथल्या निवडणुका झाल्यावर बघू !
कृषीमंत्री: देशात दुष्काळ परिस्थिती……
विपु.: दरबार आता बरखास्त करा..आम्ही युगांडावरून आल्यावर बोलू.
दरबार बरखास्त!

--चिनार