Wednesday 14 December 2016

वाट पाहावी बघून !

वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो. (आता अतार्किक विचार करण्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाहीये हा भाग वेगळा!) अश्या वेळी जे समोर दिसेल त्यावर मी विचार करायला सुरु करतो. 

        आता हेच बघा, मुंबई-पुणे हायवेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर मी गेले दीड तास माझ्या एका मित्राची वाट बघत उभा होतो. मुळात त्याच्या कामासाठी त्याने मला बोलावलं असताना मी त्याची वाट का पाहत होतो हे मलाही उलगडत नव्हतं."तू साडेचारला पोच तिथं, मी येतोच तोपर्यंत",असं फोनवर ठणकावून सांगणाऱ्या मित्राचा सहा वाजून गेले तरी पत्ता नव्हता. पाच-सहा वेळा त्याला फोन केल्यावर प्रत्येकवेळी,"बस्स आलोच" एवढं बोलून तो फोन ठेवत होता. मी उभा होतो त्यामागे एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. टाईमपास म्हणून त्याच्या जाहिरातीचा बोर्ड मी जवळजवळ शंभर वेळा वाचून काढला. बोर्डावरच्या बाईचं सौंदर्य सगळ्या प्रकारे निरखून झालं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी बांधकामावरचा मुकादम वाटत असावो बहुधा. कारण जाताजाता एकाने मला ,"काय रेट चाल्लायं इथे सध्या?" असंही विचारून घेतलं. बांधकाम क्षेत्रात सध्या मंदी आहे असं ऐकून होतो. पण म्हणून कोणी सेल्समनला दारावर उभं करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना," ओ भाऊ..घ्या ना एखादा वन बीएचके" असं म्हणायला भाग पाडेल का ? पण आता त्याने रेट विचारलाच आहे म्हटल्यावर मी सुद्धा ठोकून दिला एक रेट !

       समोर एक चहाची टपरी होती. त्याच्या टेपरेकॉर्डरवर आशिकीच्या गाण्याची कॅसेट दोन वेळा संपून आता तिसऱ्यांदा सुरु झाली होती. (चहाच्या किंवा पानाच्या टपरीवर भीमण्णांचे ,'कानडा वो विठ्ठलु" कानावर पडावे अशी अपेक्षा करणंच चूक आहे. पण झाडून सगळ्या टपऱ्यांवर आशिकी आणि तत्सम किंवा 'गुलशन कुमार पेश करते है, टी सीरिज की पेशकश' हे सोडून दुसरं काहीच कसं वाजत नाही? अरे गेला बाजार, बप्पी लहरीची तरी गाणी वाजवा ना !)  टपरीवाला कंटाळला असावा म्हणून त्याने कॅसेट बदलली.( कॅसेटचं! आशिकीच्या गाण्यांची सीडी किंवा एमपी ३ असं म्हणवत नाही हो !) आता गाणं सुरु झालं,' धीरे धीरे प्यार को बढाना है..हद से गुजर जाना है (सिनेमा : फूल और काटे).  मी विचार करू लागलो, म्हणजे नेमकं काय करायचंय ह्याला ? प्रेमात ही गोलसेटींगची पद्धत कधीपासून आली? आणि हद से गुजर जाना है म्हणजे काय रे भाऊ ? साधारणपणे ज्या काळात हे गाणं आलं होतं, त्यावेळी कॉलेजमधल्या प्रेमाचा परिपाक एकतर लग्नात व्हायचा किंवा दारूच्या बाटलीत व्हायचा. (ह्यातला दूसरा पर्याय निवडला तर डायरेक्ट मोक्षप्राप्ती व्हायची!) लग्न झालंच तर पुढे संसार, मुलंबाळं वगैरे सर्वसामान्य गोल असायचेत. पण या हिरोला हद्द म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे ? शिवाय त्या काळातला अजय देवगण म्हणजे दोरीवरच्या चार उड्या मारल्यावर धापा टाकेल असा वाटायचा. तो काय हद्द पार करणार ? असो. तर हे असे  गाणे लिहिण्यामागे काय प्रेरणा असेल ह्याचा मी विचार करू लागलो. एक असंच गाणं होतं,'थोडासा प्यार हुआ है..थोडा है बाकी'. म्हणजे प्रेमाचा ईएमआय भरत भरत ते पूर्ण करायचं ! ही एक अत्यंत सोयीची पद्धत म्हणावी लागेल. कारण झेपलं नाही की लगेच करायला डीफॉल्ट करायला मोकळे ! लवकरच क्रेडीट कार्ड फॅसिलिटी असलेलं ,'थोडासा प्यार उधार दे दे'  गाणं आलं तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका. कसं आहे की, गाणे लिहिणे म्हणजे प्यार,दिल,दिवाना,मस्ताना,दर्द इ. शब्दांचे परम्युटेशन्स -कॉम्बिनेशन्स करण्याहून वेगळं काहीही नसतं. असं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. मग त्याला थोडी  दैनंदिन व्यवहाराच्या वास्तविकतेची जोड दिली तर काय बिघडलं?

        असो. तर एकीकडे आमच्या डोक्यात  काव्याची चिरफाड सुरु असताना, त्याचवेळी व्हाटस ऍपवर दोन-चार मॅसेज आले. व्हाटस ऍप हे टाईमपासचं उत्तम साधन म्हणून लौकिकास येत असताना, ती किती मोठी डोकेदुखी आहे ह्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. कोंबड्याने बांग नाही दिली म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसंच आता गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणून दिवस सुरु व्हायचा थांबत नाही हे सांगायची वेळ आलीये. पूर्वी लोकं सरकारी नोकरीला चिकटायचे तसे आता व्हाटस ऍपला चिकटतात. आणि मेसेजेसचे प्रकार तर काय वर्णावे महाराजा !! लोकांच्या किडन्या नि डायबेटीस बरे करायला उपायांचा पूर येतोय. लवंगेपासून डांबराच्या गोळीपर्यंत पदार्थांचे एवढे औषधी गुण साक्षात धन्वन्तरीलासुद्धा माहिती नसतील. उपाय कमी पडल्यास, उर्वरित आयुष्य समाधानाने जगण्यासाठी आयुष्यावरचे मेसेज येतात. Life is like ..............अशी सुरवात असलेले हे मेसेज आयुष्याला पार कागदापासून ते कडबोळ्यापर्यंत नेऊन ठेवतात.  ह्यांचं लाईफ कधी नदीसारखं,कधी मुंगीसारखं,कधी फुलासारखं तर कधी कॉफीच्या कपासारखं  असतं .तसं ते आमचंही असतं.  फक्त आमची नदी आटलेली तरी असते किंवा कप फुटलेला असतो! मुंग्या या पायाला तरी येतात किंवा डोक्याला तरी ! फुलांसोबत काटे आणि भुंगे फ्री मिळतात! पण ह्यामुळे व्हाटस ऍप निराश होत नाही. तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून आध्यात्मिक ज्ञानाचा डोज पाजला जातो. आपण फक्त ते ज्ञान पाच-सात ग्रुपवर पाठवून स्वर्गाची एक एक पायरी चढायची असते! मी म्हणतो, हेही एकवेळ चालेल पण व्हाटस ऍपने एक मोठी गोची करून ठेवलीये. म्हणजे बघा,मी बिझी आहे,कामात आहे हे एखाद्याला  सांगण्याची सोयच राहिली नाहीये आता. निरर्थक मेसेजेस वाचून,फॉरवर्ड करून, स्मायल्या टाकून आपण रिकामटेकडे आहो हे आपणच जगाला बोंबलून सांगतो आहोत. अरे कुठे नेऊन ठेवलंय स्वातंत्र्य माझं !!

ह्या वैचारिक गोंधळात काही वेळापूर्वी व्हाटस ऍपवर आलेला एक मेसेज मी वाचलाच नव्हता. तो माझ्या मित्राचा होता," कान्ट मेक इट टुडे, स्टक अप विद सम अर्जंट वर्क ! सॉरी !" सोबतीला माझा टाईमपास व्हावा म्हणून त्याने ८-१० स्मायल्या टाकल्या होत्या. वाट पाहण्याची आमची ही यात्रा या वळणावरती संपणार होती तर! समोरच्या टपरीवाल्याचा टेपरेकॉर्डर अजूनही आशिकीच्या नावाने गळा फडात होता. मी गाडी सुरु करून निघणार तेव्हढ्यात मित्राचा फोन आला...,

"अबे निघाला का तू ? पाच मिनिट थांब येतोच मी!"

--चिनार


3 comments:

  1. Khup khup chan....pratyek veli tuza lekh vachtana khup chan watate.Keep it up.

    ReplyDelete
  2. छान लिहलंय :)
    http://marathimanatlyagoshti.blogspot.in/

    ReplyDelete