Tuesday 17 May 2016

आमचे सार्वजनिक व्यावसायिक अनुभव !

स्थळ : राहते घर
वेळ: शनिवार, सकाळचे दहा वाजलेले
प्रसंग : घरातल्या बाथरूममधले गीझर दिवसांपासून खराब झालेले आहे. त्यामुळे घरातले वातावरण जरा 'तापलेले' आहे. दोन दिवस काय केले हा प्रश्न इथे गैरलागू ठरतो कारण फाईव्ह डे वीकच्या संस्कृतीत घरगुती कामांचे स्टेटस हे फक्त शनिवारी अपडेट होते. तेसुद्धा सकाळी ते किंवा संध्याकाळी ते ह्याच वेळात ! (दुपारी ते , मी चितळ्यांची परंपरा पाळून ढाराढूर झोपतो. ह्यावेळी जगाने मला त्रास देऊ नये ,मी जगाला देणार नाही एवढी माफक अपेक्षा!). शनिवारच्या या वेळापत्रकात जर एखादे काम झाले नाही तर ते पुढच्या शनिवारी ढकलले जाते. शनिवार आणि सोमवारच्यामध्ये एक रविवार नामक क्षण सुद्धा येतो पण तो क्षीण घालवण्यात निघून जातो. असो. तर एकंदरीत शनिवार सकाळ युद्धपातळीवर सुरु होते. सकाळपासून बावीस वेळा फोन केल्यावर आमचा इलेकट्रिशियनने तेविसाव्या खेपेला फोन उचलला. गीझर बंद आहे हे ऐकल्यावर  त्याने ,'साब लाईट गयी होगी , या फिर  बिना पानी का चलाया होगा आपनेअसा सल्ला दिला. म्हणजे वीज नसल्यावर गीझर चालू होत नाही हा शोध मला अजून लागलेलाच नाही असा निष्कर्ष काढून तो मोकळा झाला. किंवा पाणी गरम करण्यासाठी आधी पाणी असावं लागतं हे सुद्धा कळू नये इतपत माझ्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असं त्याच प्रामाणिक मत असावं .मुळात गीझर आपोआप बिघडला काय किंवा मी त्याच्यात कोळसा टाकून त्याला बिघडवलं काय ह्याने त्याला काहीही फरक पडत नाही. शिवाय इतक्या वेळाने फोन उचलल्यामुळे मी आधीच वैतागालेलो, मी सरळ त्याला विचारलं, कितने बजे आओगे? त्यावर ठरलेलं उत्तर आलं, आज तो मुश्कील हैं साब, दुकान पे कोई नही हैं. ह्या 'आज कोणीच नाहीये' वाक्यांच मला नेहमीच कुतूहल वाटते. म्हणजे काल फोन केला असता तर कोणी सापडलं असतं का ? किंवा उद्या केल्यास सापडेल का ? अर्थात मी फोन केल्यावर त्याने धावत यावं अशी अपेक्षा नाही. पण उत्तर जरा तरी सकारात्मक असावं. शेवटी मी परत विचारलं, भाई साहब आज नही पर कल तो सकते हो ना? त्यावर त्याचं  आध्यात्मिक उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. तो म्हणाला, साहब कल का क्या भरोसा? मैं तो सिर्फ आज का सोचता हु !! आप भी इतनी फिकर मत करो, हो सकता हैं कल आपका गीझर अपने आप ठीक हो जाये ! अचानक मला निर्मल बाबांशी बोलतोय की काय असा भास झाला. अखेरीस अत्यंत व्याकूळतेने मी त्याला विचारले, भाई साहब इतना बता दो, कल कितने बजे आप फोन उठा सकते हैं? पण माझा प्रश्न मोबाईल टॉवरपर्यंन्त पोहोचण्याच्या आधीच निर्मल बाबांनी फोन ठेवला होता !

      येनकेनप्रकारे मी दुसऱ्या इलेकट्रिशियनचा नंबर मिळवला. फोनवर प्रस्तावना सांगून झाल्यावर कधी येतो विचारले. त्यावर तो, तुरंत आता हु  म्हणाला. संध्याकाळपर्यन्त  तो 'तुरंत' उगवला नाही. साडेसात वाजता उगवल्यावर ,'साहब मैं जल्दबाजी(!) में टूलकीट ले आना भूल गया' म्हणाला. 'अरे मग आत्ता काय गिझरचा रंग बघायला आला का ?' मी चिडून म्हणालो. नंतर त्याला कुठेतरी जायचे होते म्हणून निघून गेला. (मला एक कळत नाही,हे लोकं कायम घाईत का असतात? आणि घाईत असूनही प्रत्येक कामाला,'साहब कमसे कम आठ दिन लगेंगे' असं का होतं?) तिसऱ्या इलेकट्रिशियनला फोन करणारच होतो तेव्हढ्यात कोणीतरी सल्ला दिला की एकदा कंपनीच्या कस्टमर केयरला फोन करून बघ.
कस्टमर केयर!!!!! तुम्हाला सांगतो, भीक नको पण कुत्रं आवर यात कालानुरूप जर बदल करायचा असेल तर कस्टमर केयरला उद्देशून,'मदत नको पण प्रश्न आवर' असा करावा लागेल. एकतर ह्यांचे फोन सतत बिझी किंवा होल्डवर ठेवलेले. त्यात चुकून जर फोन लागलाच तर एक दाबा....दोन दाबा...तीन दाबा...अन्यथा गळा दाबा ! एकदा काही कारणाने बँकेतलं अकाउंट बॅलन्स जाणून घेण्याकरिता मी अठ्ठेचाळीस आकडे दाबले होते. (एवढं करून आमचं बँक बॅलन्स तीन आकडी होतं हा भाग वेगळा!) त्यानंतरसुद्धा,'अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये' हे असतेच. दुसरा भाग म्हणजे ह्यांच्या कस्टमर केयर एक्झीकेटीव्हशी बोलणे. शाळेतल्या तोंडी परीक्षेचा सराव इथे फार उपयोगी पडतो.

"नमश्कार सर ('स्कार' नव्हे 'श्कार'). क्या मै आपका पुरा नाम जान सकता हु?"
"xxxxxx"  
"क्या मै आपकी डेट ऑफ बर्थ जान सकता हु?"
"xxxxxx"  
"अच्छा. बताइये सर आपकी समस्या क्या हैं?"
"आपके कंपनीका गीझर काम नही कर रहा हैं दो दिनो से. क्या आप किसीको भेज सकते हैं?"
"जरूर सर. क्या आप गीझर का मॉडेल नंबर बता सकते हैं?"
"xxxxxx"  
"आपने ये गीझर कब खरीदा था आप बता सकते हैं?"
"ठीक से याद नही. ३-४ साल हो गये. उससे क्या फरक पडता है अब तो रीपेयर करना ही पडेगा"
"कोई बात नही. क्या आप उसका बिल नंबर बता सकते है?"
("अग  रताळे ,मला विकत कधी घेतले ते आठवत नाही तर बिल नंबर कुठून आठवणार? बरं समजा आठवलंचं  तर स्वातंत्र्यपूर्व काळात घेतलेला गीझर म्हणून फुकटात रिपेयर करून देणार का?)
"मेरे पास गीझर का बिल नही है"
"कोई बात नही सर. क्या आप ये बता सकते है के आपने कौनसे शॉप से गीझर खरीदा था?"
बस....आता माझा संयम सुटला !!
" जी हा मॅडम बिलकुल बता सकता हु. वो अपने बोहोरी आळी के चौथे गली में मारुती मंदीर है ना, बस उसके बगल में  हमारे संतोष भाऊ का दुकान है. वहा से खरीदा था"
" सर ये कौनसी शॉप है? ये हमारी लिस्ट में नही है"
"ये कैसे हो सकता है मॅडम? बहोत पुरानी और बडी दुकान है"
"ठीक है. कोई बात नही सर.आपकी कम्प्लेण्ट रजिस्टर कर दी है. आपका पता बता दिजीये. हमारा इलेकट्रिशियन आ जायेगा"
"मॅडम ये सवाल आप पहले पुछ लेती तो कितना अच्छा होता.पता लिख लीजिये"
"कोई बात नही सर. अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये !!!!"

    तीन दिवसांनी त्यांच्या इलेकट्रिशियनचा फोन आला. त्याला मुलखाची घाई असल्यामुळे ऑफिसमधून हाफ डे घेऊन मी त्याला अटेंड करायला घरी आलो. त्याने गीझर काढून बघितला. आतली कोईल खराब झाल्याचे कारण देऊन म्हणाला, "ये कोईल मार्केट में नही मिलेगी. आप कस्टमर केयर को फोन करके कोईल मांग लीजिये. जैसे ही कोईल आजायेगी मै आकर लगा दुंगा"
च्यामारी परत कस्टमर केयर !! हिम्मत करून परत त्यांना फोन केला. सगळी चौकशी करून झाल्यावर त्या मुलीने मंजुळ आवाजात सांगितले.

"सर ये मॉडेल अब कंपनीने बंद कर दिया है. इसकी कोईल नही मिलेगी. आपको नया गीझर बुक करना हो तो बताइये. अगर आप हमारे कस्टमर केयर की सेवा से संतुष्ट हैं तो एक दबाये!!!! "

आताशा घरातला गीझर बिघडत नाही. कारण वीज किंवा पाणी नसताना गीझर चालवू नये हे मला कळलेले आहे!!!


--चिनार 

3 comments:

  1. हाहाहा!
    खूपच छान. तुमच्या sarcastic comments मला भलत्याच आवडल्या.

    ReplyDelete
  2. झकास चिनारजी !

    ReplyDelete