Friday 27 March 2015

आधुनिक संगीत - एक चिंतन !

बप्पी लहिरी पासून सुरु झालेली आधुनिक संगीतातली क्रांती आता हनी सिंगपर्यन्त येउन स्थिरावली आहे. आधुनिक संगीत  म्हणजे नवसंगीत नव्हे. संगीत आणि आधुनिक संगीत  हे सर्वस्वी भिन्न विषय आहेत. संगीताची निर्मिती ही शब्द,सूर,लय,ताल, वाद्य ह्यांच्या अभ्यासपूर्ण एकत्रीकरणातून होते. शब्द कसे असावेत, ते ताल,सूर,लय यांचा वापर करून कसे वापरावेत या सगळ्या गोष्टींना संगीतामध्ये नियम आखून दिलेले आहेत. आधुनिक संगीत  या असल्या प्रकारांना मानत नाही. शब्द आणि वाद्य ह्यापासून ध्वनीनिर्मीती हा आधुनिक संगीताचा एकमेव उद्देश आहे! त्यातही शब्द एकाच भाषेतले असले पाहिजेत असं काही नाही. मुळात शब्दांना अर्थ असतो किंवा असावा यावर आधुनिक संगीतकारांचा विश्वास नाही.ऐकणाऱ्याने शब्दाचे अर्थ आपापल्या सोयीने लावून घ्यावे असं त्याचं मत आहे.आणि वाद्यांमध्ये रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजापासून ते घरातल्या भांड्याकुन्ड्यापर्यन्त काहीही वापरता येतं. संगीतामध्ये जसं एखाद्या कवितेचं गाण्यात अलगद रुपांतर होते तसं इथे होतं नाही. अलगद,हळुवार,मधुर हे शब्दच आधुनिक  संगीतकारांना मान्य नाहीत. इथे धांगडधिंगा,कर्णकर्कश् अशे शब्द जास्त प्रचलित आहेत. या संगीत निर्माणाचे  एक प्राथमिक सूत्र आहे. दहा-पंधरा विस्कळीत शब्द घ्यायचे (इंग्लिश असतील तर बेस्टच!) आणि वाद्यांच्या आवाजात त्यांना बसवायचे. नंतर गायकाकडून ते केकाटुन घ्यायचे. त्यात वेगवेगळे संगीतकार आपापल्या शैलीने बदल करतात. कमी जागेत जास्त सामान जबरदस्तीने भरताना जशी कसरत आपल्याला करावी लागते त्यालाच आधुनिक संगीतात रचनात्मकता म्हणतात. जुन्या काळात बघा प्रख्यात संगीतकारांचा वाद्यवृंद असायचा. मग रेकॉरडिंग सुरु असताना संगीतकार समोर उभं राहून त्यांना मार्गदर्शन करायचा. आधुनिक संगीतात वाद्यवृंदाला मार्गदर्शनाची गरज नसते. 'मार्ग दिसेल तिकडे वाजवा' या नियमानुसार ते वाजवतात. 'आधी कविता, मग चाल, त्यानंतर संगीत' या पुरातन कल्पनेला आता जागा नाही. जी कशीही 'चालवता' येते ती चाल ही नवीन संकल्पना आता रुजलेली आहे. त्याप्रमाणे 'आधी आवाज, मग चाल, त्यानंतर चालीत बसतील ते शब्द' ही आधुनिक संगीताची पद्धत आहे.
        जुने-जाणते रसिक या संगीतप्रकारावर टीका करतात. पण 'कुछ तो लोग कहेंगे' या उक्तीनुसार आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण आधुनिक संगीत  आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. किंवा ते पाश्चात्य संगीताचं अनुकरणही नाहीये. आता हेच बघा ना, जुन्या काळात गीत-संगीताला न्याय देऊ शकेल अश्या क्षमतेचा गायक निवडण्यात यायचा. आधुनिक संगीतात आधी गायकाची लायकी ओळखून मग  संगीत निर्माण केलं जातं. उदा. काहीही झालं तरी संजय दत्त चालीत गाऊ शकणार नाही हे आधीच ओळखून," ऐ शिवानी ...तू लगती हैं नानी" या गाण्याला चाल दिलीच नाही. तुला जमेल तसं म्हण बाबा! किंवा प्रेक्षकांना आपल्या गाण्यापेक्षा कतरीना चा डान्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे हे लक्षात घेऊन, स्वत: च्याच एका मराठी गाण्याचं संगीत तसच्या तसं उचलून "चिकनी चमेली" गाण्याला देण्यात आलं. फुकट मेहनत कशाला करायची ? मागणी तसा पुरवठा ! असे अभिनव प्रकार पाश्चात्य संगीतात होत असतील का ? पाश्चात्य संगीतातले पॉप आणि रॉक आपल्याइथे वापरतात या आरोपातही तथ्य नाहीये. कारण त्यासाठीसुद्धा प्रशिक्षण लागतं. आधुनिक संगीत हे मुक्त संगीत आहे. किंवा मोकाट संगीत म्हटलं तरी चालेल.मला सांगा ,"आता माझी सटकली ..मला राग येतोय" या गाण्यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का ? हनी सिंगची सुद्धा गरज नव्हती. रोहित शेट्टी पुरेसा होता! मला तर नवीन गायकांच कौतुक वाटतं. जुन्या काळी गाण्याचा भावार्थ रसिकांपर्यन्त पोहोचवणं ही जबाबदारी गायकाची असायची. "आज ब्लू हैं पानी पानी” या गाण्यातून बिचार्यांनी रसिकांपर्यन्त काय पोहोचवणं अपेक्षित आहे? तरीसुद्धा तल्लीन होऊन गातात.
       शाळेत असताना बघा आपल्याला बडबडगीते शिकवण्यात यायची. थोडीफार करमणूक आणि त्याद्वारे बालशिक्षण असा त्याचा ठराविक साचा असायचा. हा बालशिक्षणाचा वसा आधुनिक संगीतानेसुद्धा घेतला आहे. फक्त त्यात थोडा बदल करून बालवयातच प्रौढ शिक्षण असा नवीन साचा तयार केला आहे. पूर्वी घरादारात उच्चारायला अघोषित बंदी असलेले शब्द आता गाण्यांमध्ये सहज वापरतात. कुटुंब सोबत असताना रस्त्यावर एखाद्याने शिवी हासडली तर आजकाल कोणाला ओशाळल्यासारखं होत नाही कारण मुलाबाळांच्या कानांवर ते संस्कार आधीच झालेले असतात. उलट या प्रसंगातून  त्या शिव्यांचा "वाक्यात उपयोग" कसा करायचा हे ज्ञान मुलांना मिळते. प्रौढशिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून आधुनिक संगीतकारांचा गौरव करायला हवा. भविष्यात शाळेत प्रौढशिक्षणाचं  विधेयक संमत झालंच तर त्यासाठी आधुनिक संगीताचा कितीतरी उपयोग होईल. सरकारच्या रोजगारनिर्मिती धोरणाला सुद्धा आधुनिक संगीताचा पाठींबा आहे. संगीत ही फक्त कलाकारांचीच मक्तेदारी नसून कोणीही त्याची निर्मिती करू शकतं हा विश्वास आधुनिक संगीतानेच निर्माण केला. त्याद्वारे कितीतरी होतकरू तरुणांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी ज्यांना वाद्यांची साफसफाई करायला सुद्धा ठेवलं नसतं तेचं लोकं आता वाद्यांचा सफाईने उपयोग करतायेत. शिवाय आधुनिक संगीताला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद ही त्यांच्या यशाची पावती आहे.

      तरीसुद्धा आधुनिक संगीताला अजून योग्य तो मान मिळत नाहीये ही आमची खंत आहे. या संगीत प्रकाराला अभिजात संगीताचा दर्जा मिळायलाच हवा. कारण दिसण्यासारखे फरक कितीही असले तरी संगीत आणि आधुनिक संगीतात बरचसे साम्यसुद्धा आढळते.म्हणजे बघा, दोन्ही संगीतप्रकारांना प्रेरणेची गरज आहेच. संगीताला निसर्ग,अध्यात्म, प्रेम वगैरे गोष्टीतून प्रेरणा मिळते. तर आधुनिक संगीताला कुठूनही प्रेरणा मिळू शकते. म्हणजे अगदी बाई नं बाटली पासून झंडू बाम किंवा अगदी लुंगी पर्यन्त कुठूनही ! शिवाय प्रत्येक कलाकृतीचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे दर्दी,  तर आधुनिक संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे गर्दी!  कधी एखाद्या डिस्को-पब मध्ये जाउन बघा. आधुनिक संगीताचे कदरदान तुम्हाला तिथे दिसतील. त्या वातावरणातच या संगीतप्रकारातले बारकावे कळतात. "चार बोतल व्होडका" या गाण्याचा मतितार्थ चार बाटल्या रिचवल्यावरचं कळतो (अरे एवढी पिल्यावर लोकांना आयुष्याचा अर्थ  कळतो तर गाण्याचं काय घेऊन बसलात!). थोडक्यात म्हणजे, संगीत ऐकून धुंद होण्यापेक्षा आधी धुंद होऊन नंतर संगीत ऐकले तर त्याची मजा औरचं!  

Wednesday 11 March 2015

पुण्यनगरी !

 पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून  चांदणी चौकात जायचे होते.
 एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
                काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा."
हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?"
मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?”
बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!"
मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे?
प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ  नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!"
त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही !
               ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात  "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर  आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे.
"आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं.
मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या"
यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते."
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो,         " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !"
थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो  शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल"
      पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी  शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. स्वत: चे कौतुक करताना तर कुठला थर गाठतील सांगता येत नाही. एका मावशींच्या मते, जगातल्या सर्वात उत्तम प्रतीच्या गोष्टी त्यांच्या पुणातल्या घराजवळच मिळतात. म्हणजे त्यांच्या घरासमोरच्या स्टॉलवर  मिळणाऱ्या "सकाळ" पेपर सारखा 'सकाळ' कुठेच मिळत नाही हे त्यांच्या मुखातून मी या कानांनी ऐकलं आहे ! मराठी व्याकरणाला अतिशयोक्ती अलंकाराची गरज का पडली असेल हे त्यादिवशी कळले. दुसरी म्हणजे, स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. “आम्ही फक्त अमक्या अमक्याचीच मिसळ खातो बाकी कुठेच खात नाही. मुळात दुसरीकडच्या मिसळेला आम्ही मिसळ मानतच नाही”,असे वाक्य नेहमीच ऐकायला मिळतात . त्या "अमक्या" नी मिसळेत फरसाण ऐवजी माती टाकून दिली तरी चालते. किंवा “आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे” हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल.
       काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
-- चिनार



Tuesday 10 March 2015

एक काहीतरी……

मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !


कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय 

आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय 

शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ? 
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!

राधा

गोकुळ नसले तरी चालेल , 
पण आयुष्यात एक राधा असावी !

एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !

गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक राधा असावी !

कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

Monday 2 March 2015

क्लिकक्लिकाट !

      नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय.
तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू "
पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे !
       वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल. आता हेच बघा ना, लग्न लागल्यावर सगळ्यांना वधु - वरांसोबत फोटो काढायचा असतो. ग्रुप फोटोसाठी आधे इधर -आधे उधर असं करून पंधराजण फोटोसाठी वधु-वराजवळ उभे राहतात. समोर मुख्य फोटोग्राफर चा कॅमेरा, घरातला एक कॅमेरा, एका नातेवाईकाने नविनच घेतलेला अत्याधुनिक कॅमेरा, दोन -तीन मोबाईल कॅमेरे असे जवळपास - कॅमेरे असतात. फोटो निघतो. सगळ्यांना अगदी भरून पावल्यासारखं होतं. फोटोसुद्धा अगदी आरशात  बघितल्यासारखा स्वच्छ येतो. फक्त एवढंच होते की फोटोतला प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅमेराकडे बघत असतो ! किंवा एखाद्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असतो. नातेवाईक, मित्र, बालगोपाळ केक भोवती जमतात. तेवढ्यात केकचे फोटो काढण्याची सूचना येते. मोठमोठे मोबाईल खिशातून बाहेर येतात. वेगवेगळ्या कोनातून केकचे फोटो निघतात. मुलगा- आई, मुलगा-बाबा, आई-बाबा, आई-बाबा-मुलगा, मुलगा-केक, आई-बाबा-मुलगा-केक अश्या शक्य असलेल्या सगळ्या जोड्यांचे फोटो निघतात. मग केक कापल्यावर आई मुलाला केक भरवताना, बाबा मुलाला केक भरवताना, आई -बाबा एकमेकांना भरवताना असे फोटो होतात. सगळ्या पाहुण्यांना अगदी अपूर्व सोहळा पाहिल्याचा आनंद होतो. इथपर्यन्त ठीक आहे पण याच्या अगदी विरोधी फोटो सुद्धा तुम्ही सोशल मेडिया वर बघितले असतीलच. रस्त्यावर अपघात होतो. बसने मोटरसायकलला धडक दिलेली असते . मोटरसायकलस्वार जखमेने विव्हळत असतो. काही लोक त्याची गाडी उचलतात, काही त्याला धीर देतात, काही त्याच्या घरी संपर्क करतात, काही नुसतेच बघ्याच्या भूमिकेत असतात.आणि काहीजण खिशातला फोन काढून त्या दृश्याचे फोटो काढतात !
      फोटो काढण्याची आणि काढून घेण्याची चढाओढ सुरु  झाली आहे. लहानपणी बगीच्यात गेल्यावर पाळण्यावर बसण्यासाठी भलीमोठी रांग असायची. तशी रांग आतासुद्धा असते. पण ती बसून झुलण्यासाठी नाही तर बसून फोटो काढण्यासाठी! बरं, एक फोटो काढून समाधान होत नाही, १५-२०  फोटो हवे असतात. मग हाती डीजीकॅम घेतलेले उत्साही नवरे किंवा बाप वेगवेगळ्या कोनातून फोटो काढतात. प्रत्येक माणसात कुठेतरी एक कलाकार दडला असतो असं म्हणतात. डीजीकॅम हातात आल्यावर बऱ्याच लोकांमध्ये 'आपल्यातला कलाकार सापडलाय' अशी भावना बळावत असावी. खरं म्हणजे फोटोग्राफी मध्ये झालेल्या तांत्रिक क्रांतीमुळे या  नवक्रांतीकारक फोटोग्राफर्सचा जन्म झालाय. आधी ३६ फोटोंची रीळ वर्षभर पुरवावी लागायची. डिजिटल कॅमेरे आल्यापासून रीळ वैगेरे भानगड उरलीच नाही. एका तासात ३६ फोटो काढायचे. त्यातले - तरी बरे येतातच !  वाट्टेल त्या गोष्टींचे फोटो काढत सुटतात. घरातल्या गॅलरीतून बाहेर उडणाऱ्या पक्षांचे फोटो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ! घरातल्या पंख्याचा फोटो. मोशन फोटोग्राफी ! कपात स्थिर झालेल्या चहाचा फोटो. स्टिल फोटोग्राफीमस्ती करणाऱ्या स्वत:च्या मुलांचा फोटो. कॅन्डीड फोटोग्राफी ! (माझ्या तीन वर्षाच्या पुतण्याचे हजाराच्या वर फोटो असतील ! माझ्या लहानपणी फोटो काढताना आमच्यासारख्या  चिल्ल्यापिल्ल्यांना दूरच ठेवायचे. एखाद्या ग्रुप फोटो मध्ये कोणाच्यातरी कडेवर किंवा खाली जमिनीवर आम्ही बसायचो. किंवा उत्साहाच्या भरात एखाद्या फोटोत कुठूनतरी कोपरयातून डोकं बाहेर काढून आपली हौस भागवून न्यायची. पूर्ण देह दिसेल असे तर फारच कमी फोटो असतील.)
      पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या फोटोग्राफरचे फोटो कोणीच काढत नाही. तो स्वत: मोठ्या ऐटीने कॅमेराची किंमत, फीचर्स सगळ्यांना सांगतो. कॅमेराचा कौतुक सोहळा पार पडतो. प्रत्येकजण आपापले फोटो काढून घेतो. त्याचे फोटो काढायला कोणीच उरत नाही. (म्हणूनच मी ठरवलंय आयुष्यात कधी कॅमेरा घ्यायचा नाही. खिशातले पैसे खर्च करून लोकांचे फोटो काढण्याचे धंदे सांगितले कोणी ?) स्वत: चे फोटो काढण्यातली गोची लक्षात आल्यावर एक नवीन प्रकार उदयास आला. सेल्फी !! स्वत: चे फोटो स्वत: काढणे. सेल्फीचं तांत्रिक नाव बहुधा 'उठसूट फोटोग्राफी' असं असावं. कारण सेल्फी काढायला कुठलही कारण किंवा प्रसंग असावा लागत नाही. मनात आलं की मोबाइल हातभर लांब धरायचा आणि क्लिक ! बसमधून फिरताना, जेवतांना,व्यायाम करतांना, पुस्तक वाचतांना  सेल्फी कधीही काढता येतो. म्हणूनच  सेल्फी काढताना माणसाने कितीही लपवलं तरी फोटोत  'आपण बावळटपणा करतोय' हे भाव दिसल्याशिवाय राहत नाही. जसं फ्लॅशमूळे काही लोकांचे डोळे मिटतात तसं सेल्फी काढताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. ती चमक म्हणजेच मेंदूने पाठवलेला 'काय बावळटपणा लावलाय' असा संदेश असतो.  फोटोग्राफी ही जर कला असेल तर सेल्फी हे त्या कलेचं विडंबनचं म्हणावं लागेल.

        खरं म्हणजे कॅमेरा हा मानवी इतिहासात लागलेला एक विलक्षण शोध आहे. घडलेला एखादा प्रसंग कैद करून ठेवता येणे म्हणजे विज्ञानाची देणगीच म्हणावी लागेल. पण इथेच थोडीशी गल्लत झालीये. विज्ञानाची देणगी ही घडणारा प्रत्येक क्षण नव्हे तर 'एखादा' प्रसंग कैद करून ठेवण्यासाठी आहे.कारण घडणारे प्रसंग हे आठवणीत ठेवण्यासाठी असतात, "गॅलरीत" ठेवण्यासाठी नाही ! त्यासाठीच ईश्वराने डोळ्यांसारखा कॅमेरा निर्माण केलाय. ज्याद्वारे असंख्य क्षण स्मृतीच्या गॅलरीत साठवले जातात. आणि स्मृतीपटलावर हवे तेंव्हा बघता येतात.